Tuesday, April 24, 2012

digu

दिगू

        हल्ली गावी जाण फारसं होत नाही. वर्षातून एखादी चक्क्कर मारतो. माझं गाव रुई. भुवया उंचावू नका. अशा नावाचं गाव आहे. तालुका माहूर ,जिल्हा नांदेड. मुंबई हून दुपारी ३ वाजताची नंदीग्राम एक्ष्प्रेस पकडून १५ तास प्रवास करून किनवटला उतरायचं. तिथून एस टी ची बस पकडून १ तासात माहूर. तिथून शेअर रिक्षा (स्थानिक भाषेत त्याला आटो म्हणतात)  करून रुई ला पोचायचं. या प्रवासास एखादा तास लागतो. माहूर च्या डोंगर पायथ्याशी रुई गाव. (वनराई ने नटलेलं वगैरे विशेषणं मी लावणार नाही.कारण ते काही खरं  नाही  ). माहूर चा घाट  उतरून पायथ्याशी असलेल्या केरोळी फाट्या पासून आत वळायच. कच्चा आणि  (उन्हाळ्यात गेलात तर भकास) रस्ता आणि तीन मोठे पण कोरडे ठणठनित नाले ओलांडून मग येत आमच रुई गाव. रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी मुले तांब्या (याला टमरेल म्हणतात) घेऊन रांगेत  योग साधना करतांना  दिसली कि गावाच्या वेशीत पोचल्याचं कळतं. (तसं सरकार ने सगळ्यांना शौचालये बांधण्या साठी  साहित्य दिलं होत  पण लोकांनी  ते  विकून टाकलं.  बंदिस्त खोलीत  अशी काम करणं त्यांना मान्यच नाही.)    मग तिथे रिक्षा सोडून घरापर्यंत पायी जायचं. लहानसं गाव त्यामुळे  सगळेच ओळखीचे. नमस्कार चमत्कार घेत लहान मोठ्यांची चौकशी करत आम्ही पारापाशी येतो. आणि तिथेच "त्याच" पाहिलं दर्शन होतं.

      पारावर मारुतीच छोटंसं मंदिर आहे. पूर्वी फक्त मूर्ती होती. मंदिर हल्लीच बांधून काढलय. मारुतीच्या चरणाशी नत मस्तक होतो. आणि मागून हाक येते. राम राम मालक. मागे बघतो तर दिगु हात जोडून उभा असतो. "यंदा आमदार निधीतून मंदीर बांधून काढलं", डीगु म्हणाला. "लोक नुसतेच बोलतात मी करून दाखवलं. आता पुढच्या साली  पाण्याचं टाक बांधून घेतो. बायका पोरींना लई दूर जाव लागते पाण्या साठी." त्याचं ते  बोलण आणि  त्याचा अवतार आता नेहमीचा झालेला, त्यामुळे त्याच काही विशेष वाटत नाही.
भली मोठी दाढी वाढलेली, केस पिंजारलेले. एकावर एक असे २ शर्ट घातलेले तेही फाटलेले. खाली कळ कट्ट विजार. पायाला भल्या मोठ्या भेगा पडलेल्या. चेहरा मात्र आनंदी आणि फ्रेश.
एकंदरीत तो तश्या अवतारात भिकारी तरी दिसतो  किंवा वेडा तरी.

    दिगू म्हणजे किसन  गायकवाड  चा मुलगा. मोठा दिगंबर, लहान संतोष. दिगू माझ्यापेक्षा ४-५ वर्षांनी तरी मोठा.
दहावी फेल झाल्यावर गावात उनाडक्या करत फिरणे आणि नसलेले ज्ञान पाजळणे हाच उद्योग. शिकत नाही  म्हटल्यावर बापानं  त्याला  शेतीच्या कामाला  जुंपला. नाईलाजाने दिगू शेत मजुरी करू लागला. खरं म्हणजे ती मजुरी कमी आणि मुजोरीच  जास्त होती. त्याला मुळात कामाचा भयंकर कंटाळा. गुरांना चारा कापून देण्यापेक्षा त्यांनाच गवतात सोडायचा. खा लेको किती खायचं ते. आणि स्वतः मात्र पाखरं हकलायच्या मचाणावर झोपून राहायचा. मग जनावर दुसऱ्याचा शेतात जाऊन पिकांचं नुकसान करणार. तो शेतमालक आरडा ओरड करत येणार. आणि दिगू त्यांना शांत पणे उपदेश करणार.  अहो मालक बैल म्हणजे शंकराचं वाहन. त्याला अडवणारे आपण कोण?

      माझे वडील त्याला बऱ्याचदा शेतात मजुरी साठी बोलावत. दिगुला काम देण म्हणजे स्वतःच नुकसान करून घेणं. पण  मजुरांची कमतरता ... आणि किसन गायकवाड म्हणजे बाबांच्या बैठकीचा खास माणूस. म्हणून दिगुला हमखास  कामाचं आमंत्रण जायचं.  सकाळी ६ ला काम सुरु करायचा गावात रिवाज आहे. पण दिगू येणार ८ वाजता. रमत गमत. औत सुद्धा हाणायच अगदी आरामात. बाकीच्या गड्यांच्या २ फेऱ्या नांगरून होणार तेंव्हा कुठे दिगुची एकच फेरी होणार. तत्वज्ञान एकच ... मुक्या जनावराला कशाला त्रास !!! काम काय होत राहील हळू हळू. १० वाजता औत सोडून न्याहारी करणार. मग काट-सावरी च्या झाडा खाली वाईच डुलकी घेतो म्हणून चांगला तास भर झोप काढे. ह्यातही त्याच तत्वज्ञान - जेवल्यावर झोपला नाहीं तर अंगी लागत नाही म्हणे. ११ वाजता बाबांची शेतात दुसरी चक्कर मारायची वेळ. तेंव्हा दिगू उठून पुन्हा औतावर. बाबा रागावले की म्हणे ... मालक, दुसऱ्या गड्यांना कामच करता येत नाही व्यवस्थित. मी कसा खोल वर दाबून नांगर चालवतो. म्हणून मला वेळ लागतो. असाच १-२ तास नांगर हाणून मग पारगीची   वेळ (पारगी म्हणजे ऑफिशिअल  लंच टाइम) चांगली तास भर भाकर खाऊन झाल्यावर पुन्हा एक वाम कुक्षी. नंतर चहाची वेळ. शेतात  पाणी देणं सुरु असेल तर शेळ्या चारणारे शेळ्की हमखास  त्यांना पाणी पाजायला आणत. दिगू एखादी शेळी पकडून  दुध काढून घेई. मग  चहा करून  त्या शेळ्क्याला आणि इतर गड्यांना चहा करून पाजणार. अविर्भाव असा की ह्याच्या सारखा दानशूर कोणी झालाच नाही. हे सगळं झाल्यावर एखादा तास  काम  करून निघाला घरी जायला. बाबांनी तर त्याच नाव  कार्य सम्राट ठेवलं होत.

       सगळ्यांची होतात तसं त्याचही लग्न झालं. मुलं झाली. गावात सगळ्यांना वाटलं आता तरी जबाबदारी ची जाणीव होईल. पण काही फरक पडला नाही. त्याचं असंच सुरु राहिलं. दिगुचे आई वडील  गेल्यावर  संतोष ही लग्न करून दुसऱ्या गावी गेला.  दिगुची बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.  माझे वडीलही देवाघरी गेले. आणि दिगुचा आधारच गेला. पण हे सगळं जसं काही त्याच्या पथ्यावरच पडलं. दिगूने काम करणच सोडून दिल.

      जगातला सर्वात सोपा उद्योग त्यानं सुरु केला. भिक्षाम देही. मिळेल  तिथे मिळेल ते खाऊन पडून राहायच.  कधी पाटलाच्या ओट्यावर... कधी पारावर निद्रासनात पडलेला दिगू लोकांना आता सवयीचा झालाय . पोटाची सोय फुकटची झाल्यावर माणसाला तत्वज्ञान फुटत. पारावर बसून दिगू लोकांचं भविष्य सांगतो. मोठ्या मोठ्या थापा मारतो. एकदा मला सांगत होता, मालक  तुम्हाला शिक्षणासाठी कर्ज  पाहिजे असेल  तर सांगा. आमदार आपला माणूस आहे. एका दिवसात तुमचा काम  करून देतो. त्याची चेष्टा करायला लोकही त्याला चढवून देतात . मग  हा आणखी चेकाळतो.
   
      असं करता करता दिगुला ठार वेड लागलं. तो काही दगड घेऊन लोकांच्या मागे लागत नाही. की कोणाला शिवी गाळ करत नाही. गाव भर चिंध्या झालेले कपडे आणि पाठीवर एक कसलं तरी पोतं घेऊन हिंडत असतो. आणि लोकांना तत्व ज्ञान देत असतो.
     
      एकदा असाच गावी गेलो होतो. सकाळी उठून समोरच्या अंगणात बसलो होतो. "राम राम मालक !"  म्हणून हात जोडून दिगू उभा. माझ्या उत्तराची वाट न   पाहता तो आसनस्थ झाला. अवतार तोच . घाणेरडे कपडे आणि एका हातात  काठी आणि दुसऱ्या हातात  झोळी वजा पोतं. "तुम्ही आले म्हणून लोक  सांगत होते. म्हणून  तुमच्या संग चहा प्यायला आलो".  मी आईला चहा टाकायला सांगितलं. समोरच्या रस्त्या कडे बघत दिगू म्हणाला "बरसातीत लई चिखल  होतो या रस्त्यावर. मी आमदाराला सांगतो आमदार निधी तून  हा  रस्ता बांधून द्यायला".  आता मात्र मला सहन  होईना. मी त्याला जरा रागानेच  म्हणालो "दिगू अरे काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? अरे कोण आमदार? लोक  तुला चढवतात आणि तुही चढतोस . काय हा हाझा अवतार. बघवत नाही रे. का झालं हे असं? "

     मला व्यथित झालेला पाहिल्यावर दिगू म्हणाला "मालक दुखी होऊ नका. नशिबात जे असते तेच आपल्याला मिळते. अहो मी एकटा जीव. काम करून कमाई करून कोणता महाल बांधायचा आहे आपल्याला? दोन टाईम चं मिळते न खायला. समाधान आहे. लोक पुण्यवान आहेत. आज पर्यंत मला एक दिवस हि उपाशी ठेवला नाही. रोज कोणी न कोणी मला शिळी का होईना ... पण भाकर देतेच खायला. बरं आपल्याला काही जास्त अपेक्षा नाही. गव्हाचीच रोटी खायची कधी इच्छा झालीच तर पाटलाच्या घराकडे चक्कर मारतो. तीही इच्छा पूर्ण होते."
        मी म्हणालो "अरे पण असं वेड्याचं सोंग घेऊन का फिरतोस मग? घाणेरडा राहतोस. काय तुझे कपडे ... काय ती झोळी" 
        यावर दिगू म्हणाला - गाव आपल्याला जेऊ घालते मालक. आपलंही काम आहे गावाच्या कामी येणं. असा वेड्यासारखा फिरून ... विनाकारण बडबड करून लोकांचं मनोरंजन करतो मी. इथे गावात काही तुमच्या  शहरा सारखी  शिनेमा टाकी नाही. म्हणून मीच त्यांचा शिनेमा आणि मीच त्यांचं नाटक. येता जाता कोणी तरी विचारते - "काय आमदार साहेब यंदा कर्ज माफ होणार का?" मी म्हणतो  "शंभर टक्के होणार. कालच मुख्य मंत्र्याशी मीटिंग झाली. म्या ठणकावून सांगितलं कि गरीब शेतकऱ्याच कर्ज माफ झालाच पाहिजे. " कोणी तरी म्हणतो  "दिगंबर राव, शाळा काढा कि एखादी गावात". मी म्हणतो "यंदा नाही. यंदा पाण्याचा प्रश्न मिटवणार. शाळा पुढल्या साली." विचारणारा खुश होतो. तो मनात म्हणतो कशी फिरकी घेतली येडयाची.
अस आहे मालक. 


त्याचं ते बोलणं ऐकून मी थक्कच झालो. चहा पिऊन झाला. मी त्याला पैसे देऊ केले. तर तो म्हणाला - मालक पैशे देऊ नका. या पैशानं विकत घेता येईल अशी माझी कोणतीच गरज नाही माझी. मी म्हणालो - अरे अस काय करतोस? या पैशातून चांगले कपडे विकत घे. तर दिगू म्हणतो - नाही मालक . चांगले कपडे घालणं मला परवडणार नाही. असा फटका राहतो म्हणून लोक मला विचारतात. उद्या मी जर चांगला राहू लागलो तर कुत्रा सुद्धा हुंग्णार नाही. एकदा लोकांना कळलं कि माझ्याकडे पैशे आहेत  कि मग हा दिगू मेलाच म्हणून  समजा. 


तेही मला पटलं. मी त्याला विचारलं - बायको पोरांची आठवण येत नाही का? यावर दिगू म्हणाला - मालक आठवण तर लई येते. माझा पोरगा आज १२ वर्ष असन. आणि पोरगी १० वर्षाची. लई वाटते जाऊन भेटून याव . पण मग मीच स्वतःला आवरतो. एवढ्यात  शेजारचा संदीप अंगणात आला. त्याने दिगुचं   शेवटचं वाक्य ऐकलं. तो म्हणाला "अहो मग जाऊन या . पोरांना भेटून या." यावर दिगून  डोळा मारला आणि म्हणाला "असं कसं चालल  बाबा. आता आमदार म्हटलं कि लोकांची काम आधी करायला पाहिजे. कुटुंब नंतर. आता हे गावच  माझं. अन  मी या गावाचा !!!"


हे ऐकून संदीप मोठ्याने हसला ... आणि कामावर निघून गेला. दिगुनेही त्याची झोळी उचलली आणि भिक्षां देही करायला निघाला. जाता जाता मला सांगून गेला "वापस जातांना फाट्या पर्यंत चालत जाऊ नका. मला सांगा. मी पी. ए. ला गाडी घेऊन पाठवतो !!!"