Wednesday, June 10, 2020

आज पुन्हा दचकून जागा झालो. पुन्हा तेच स्वप्न पडलं होत. तोच ओळखीचा  हसरा चेहरा. अशीच अधून मधून  येते ती स्वप्नात. आणि अस्वस्थ करून जाते.

जवळपास ७ वर्षांपूर्ची गोष्ट आहे. माहूरचं  एक काम आटोपून परत निघालो होतो. अजित आला होता बस-स्टँड वर सोडायला. अडीच वाजताची पांढरकवडा नांदेड गाडी लागलेली होती. त्यात आधी जाऊन जागा पकडली आणि मग  उस्मान भाई कडून खारे दाणे , ठाकरे मामाकडून वर्तमान पत्र घेणे, भिक्षुकांना असेल ती चिल्लर देणे, असा नेहेमीचा कार्यक्रम उरकून जागेवर येऊन बसलो.  प्रवास फार मोठा होता. माहूर-नांदेड साडेतीन तास. पुढे नंदीग्राम एक्सप्रेस ने मुंबई. एकूण प्रवास १७-१८ तासांचा. गाडी सुरु झाली. खिडकी शेजारची जागा होती. बाकी लाल डब्ब्यात खिडकीची जागा मिळणं म्हणजे भाग्यच. त्या काळी बस ला लाल डब्बाच म्हणायचे. लाल परी वगैरे म्हणत नव्हते.

गाडीने वेग घेतला तसा गार वारा चेहऱ्यावर आदळायला लागला, आपसूकच डोळे मिटले गेले. गेल्या २-३ महिन्याचा घटनाक्रम डोळ्यांसमोर यायला लागला. खूप दगदग  झाली  होती या काळात.
गेले ३ महिने दर आठवड्याला  जायचो माहूर ला. शुक्रवारी ठाण्याहून नंदीग्राम एक्सप्रेस ने निघायच. शनिवारी काम उरकायचं आणि रविवारी त्याच ट्रेन ने परत. कारणही तसंच होत. आम्ही माहूर ला विकासघर सुरु केल होतं. गरीब, आदिवासी मुलांना शिक्षणाची गोडी लावून त्यांना शाळेतले विषय समजावून द्यायचे. त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती, त्यांचे पुण्याला प्रशिक्षण, वर्गासाठी जागा शोधणे आणि मुख्य म्हणजे मुलांना विकासघरा पर्यंत आणणे. दिव्यच होते ते. पुण्यात ग्राम मंगल सोबत समन्वयाची  जबाबदारी सौरभ ने घेतली. माहूर ची जबाबदारी अजित ने. आईची प्रेरणा आणि मदत होतीच. अर्थात याविरुद्धही  बऱ्याच लोकांचे मत होतेच. काही लोकांनी सल्ले दिले कि इथे काही करून उपयोग नाही. मुलांना शिक्षणात अजिबात रस नाही. एका स्थानिक शिक्षकाने तर इथल्या मुलांचा बुध्यांक कमी असतो आणि म्हणून तुमच्या प्रयत्नांना काही अर्थ नाही असेही ज्ञान दिले होते. बऱ्याचश्या  लोकांना  अशी शंका  होती कि काहीतरी आर्थिक फायदा असणार ... त्याशिवाय उगाच कोणी कशाला शहरातून गावात येऊन असले उद्योग करतोय!

काही लोकांनी मदत केली. काहींनी विरोध. बरेच लोक  नुसतेच मजा पाहत होते.
आम्ही मात्र वेगळे होतो. त्याशवाय का अनंत अडचणींतून मार्ग काढून ३ महिन्यात सुरु केल विकासघर? आणि ग्राम मंगल च्या प्राची ताईंनी हि पावती दिली होती...  कि लोक नुसतेच चर्चा करत राहतात, तुम्ही सरळ कृती करून दाखवलीत. त्या दिवशी पहिला वर्ग भरला होता. तब्बल ३० मुलं  आली होती. त्यांच्या पालकांनी धन्यवाद दिले आम्हाला. गावातल्या थोर मोठ्यांनी कौतुक केले. फार छान वाटले होते . अभिमान वाटला की आपण सर्वसामान्यांसारखे नाहीत.  या ३० मुलांचे भविष्य बदलणार आपण.

विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. जाग आली ती उमरखेड ला बस थांबली तेंव्हा. खूप गर्दी  झाली  होती  गाडीत. एक म्हातारी आजी बाई काठी टेकवत आत चढली. उभे राहायला जागा नव्हती तिथे तिला बसायला काय जागा मिळणार होती? मी जरा आजू बाजूला पहिले. सीट वर बसलेल्यांपैकी अनेक जण तरुण होते.  त्यांनी उठायला नको या म्हातारी साठी? साध सौजन्य नाहीये लोकांना. स्वार्थी सगळे.  मीच उठलो शेवटी. आजीला बसायला जागा दिली. आजी छान हसली. लमाणी भाषेत तोंड भरून आशीर्वाद दिले. ती काय बोलली ते मला फार कळाल नाही. पण बहुधा म्हणाली असेल कि तुझ्या सारखे लोक फार कमी असतात बेटा  जे स्वतः च्या सुखाचा त्याग करून दुसऱ्यांना मदत करतात. खरंच होत ना ते. आपण या गर्दीपेक्षा वेगळे आहोत नाही का? असा विचार करत उभा राहिलो तास भर.

पावणे सहा वाजले होते आणि गाडी अजून नांदेड शहरात शिरली नव्हती. अजून १० मिनिट लागणार स्टेशन ला पोचायला. सहा ची ट्रेन नको मिस  व्हायला. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये  क्लायंट व्हिसिट होती  आणि त्यात माझ्यावर महत्वाची जबाबदारी होती. त्यामुळे पहाटे पर्यंत मुंबईत जायलाच हवं होतं. 
मोबाइल वर पाहिलं तर ट्रेन पंधरा मिनिटे  लेट होती. चला बरं झालं. स्टेशन बाहेर टपरी वर चहा घेता  येईल जरा ५ मिनिटे थांबून.
असा विचार करतो न करतो तोच बस थांबली स्टेशन समोर. लगबगीने उतरायच होतं पण वाट बघितली सगळ्यांनी उतरण्याची . सगळे उतरल्यावर मग मी उतरलो. सौजन्य आहे ना आपल्यात. या लोकांसारखे कुठे आहोत आपण?

तोबा गर्दी होती आज रस्त्यावर. झप झप चालत निघालो. एक द्रुश्य पाहून मात्र जागेवरच थबकलो. एक आजी बाई रस्त्याच्या कडेला चिखलात पडलेली होती. जरा निरखून पाहिल्यावर खात्री झाली कि यात्रा संपली होती तिची. अंगावरच्या सुरकुत्यांवरून सत्तरीतली असावी. कपाळावर कुंकू नव्हत. लुगडं फाटलेलं. हातात बांगड्या नाहीत. शरीर यष्टी अत्यंत कृष. रस्स्त्यावरच जगत असेल बहुधा . नवरा गेल्यावर मुलानि काढून दिल असेल घरातून. मिळेल ते खाऊन जगत असेल बिचारी. मुलांच जाऊ द्या. आता ही मरून पडलीये रस्त्यावर. इतके लोक चाललेत शेजारून पण कुणी थांबून  बघत नाहीये. कसली ही घाई झालीये लोकांना. असंख्य विचार मनात येऊन गेले.
काय करावं? थांबावं का?  हिच्या नातेवाईकांचा शोध घ्यायचा  का? जरा आजूबाजूला टपरी वाल्यांना विचारून कळेल काही तरी. की पोलिसांना बोलवायचं?
इतक्यात गाडीची शिट्टी ऐकू आली. माझीच ट्रेन आली असणार. काय करावे? उद्याची कस्टमर मीटिंग? जायलाच हवं. जाता जाता ओझरता तिचा चेहरा पाहिला. हसू होतं तिच्या चेहेऱ्यावर. ते हसूच अस्वस्थ करत होतं मला. 

फार विचार न करता पळतच प्लॅटफॉर्म वर आलो आणि गाडीत शिरलो. आईला निघाल्याचं आणि रश्मीला मी उद्या नक्की येणार आहे याचे फोन करून झाले. हिला मी परतीच्या गाडीत बसेपर्यंत भरवसा नसतो. एव्हाना गाडी निघाली होती. आईने दिलेले धपाटे काढले बॅगेतून. धपाटे आणि मीठ भुरका यात आमच्या आईचा हात कोणी धरू शकणार नाही. एरवी मला ट्रेन मध्ये सह-प्रवाश्यांशी गप्पा मारायला आवडते. त्यात नांदेड गाडीत हमखास कोणी तरी ओळखीचं भेटतच. औरंगाबाद येईपर्यंत गप्पा मारून, काही मित्रांना फोन करून, जरा मोबाइल वर टाईम पास करून वरच्या बर्थ वर जाऊन झोपायचं हा नित्य कार्यक्रम. 

पण आज काही लक्ष  लागेना. जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही त्या  म्हातारीचा  चेहरा  काही डोळ्यांसमोरून जात नव्हता. हसत होती ती माझ्यावर. तिच्या त्या प्राणहीन डोळयांनी माझे डोळे मात्र खाडकन उघडले होते. ती सांगत होती की मीही त्या गर्दीतलाच एक होतो जे तिच्यासाठी थांबले नव्हते. सगळा अभिमान गळून पडला होता. मीच जर एवढा परोपकारी होतो तर का नाही सोडून दिली ती ट्रेन?  काय अधिकार होता मला त्या बस मधल्या लोकांना नावं ठेवायचा? एकच माणूस वेगळ्या परिस्थितीत वेगळा वागू शकतो.  पण हेच जर खरं असेल तर मग चांगल्या कामांच श्रेय आपण घ्यायच आणि जे करता नाही आले त्याला परीस्थितिला जबाबदार धरायच हे योग्य आहे का?
पोट फुटेपर्यंत जेवून उरलेलं अन्न अनाथाश्रमात देऊन  आपण दानशूर? भिकाऱ्याला सुद्धा आपण फक्त चिल्लर देतो. आणि चिल्लर नसेल तर सरळ हात वर करतो ना, की जातो शंभर चे सुट्टे करायला?

उपनिषदांत दानाचा अर्थ दिलाय "सम्यक विभाजन". ज्याच्याकडे जे विपुल आहे त्याने ते वाटावे. आणि जो घेतोय त्यानेही कमीपणा वाटून घेऊ नये. ज्याच्याकडे धन विपुल आहे त्याने धन वाटावे , ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा. कोणी कष्टाने मदत करावी  तर कोणी नुसता आनंद वाटावा. पण मुख्य म्हणजे या देण्याचा अभिमान वाटून घेऊ नये.

परीक्षित राजाची एक गोष्ट आठवली. या पुण्यवान राजाच्या मेंदूत कलिने एक क्षण प्रवेश केला आणि त्या एका क्षणात त्याच्याकडून पाप घडलं होतं.  आणि आता तर घोर कलियुग आहे. कोण जाणे कदाचित आपल्या सदैव भ्रष्ट असणाऱ्या मेंदूत एका क्षणासाठी प्रवेश करून देवच पुण्य  घडवून आणत असेल.

जेंव्हा जेंव्हा "ग" ची बाधा होते, तेंव्हा तेंव्हा "ती" येतेच स्वप्नात आकाशात उडणाऱ्या मला परत जमिनीवर आणायला.  

Friday, May 10, 2013

gampha

गम्फा 


         उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा असायची. दिवस भर आम्ही शेतातच असय्चो.  शेत नदीच्या काठाशी. त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी असायच शेताला. जंगलातून बरेच प्राणी पाण्याच्या शोधात हमखास नदीला पाणी प्यायला येत. आणि येता जाता  शेताच नुकसान करत. म्हणून राखण करायला नेहमी एक गडी शेतात असे. कधी कधी मजा म्हणून आम्ही मुल पण रात्री जागली ला शेतात जात असु.  शेकोटी पेटवली कि प्राणी येत नसत. पण शेकोटी पाहून "तो" मात्र हमखास यायचा. 
राम राम हो …. अशी लांबूनच हाळी  देऊन "गम्फा" यायचा.

        या गम्फाची  मला फार भीती वाटायची. तो होताही भीतिदायक. अंगात पट्ट्या पट्ट्याचा  बिन  बाह्यांचा बनियन, दोन्ही खिसे भरून कसला तरी झाड पाला . खाली गुडघ्यापर्यंत धोतर. पायात कडक टायऱ्या. खेड्यात मोटर सायकल च्या टायर पासून चपला बनवतात. त्यांना टायऱ्या म्हणतात. राना वनात फिरतांना काटे वगैरे टोचू नयेत म्हणून याचा चांगला  वापर होतो. आणि  टाकाऊ टायर वापरून बनवलेल्या म्हणून खूप स्वस्त. आणखी म्हणजे विञ्चू वगैरे मारायला फार उपयोगि. गम्फाने  एकदा टायऱ्या ने साप मारल्याची कथाही गावात प्रसिद्ध आहे.  या शिवाय डोक्यावर पटका. त्याच्यात कसल्या तरी लहान लहान काडया खोचलेल्या.  कानाला अर्धवट वापरलेली विडी. कधी कधी त्याच्या पायाला म्हणजे पोटरी पाशी लहानशी दोरी गच्च बांधलेली. एका हातात झाड पाला. आणि दुसऱ्या  हातात कुऱ्हाड.  वयाने साधारण सत्तरीत असावा. पण अजूनही चित्त्या सारखा चपळ.

       याच खर नाव गणपत. याचाच पुढे गणपा, गम्पा आणि पुढे गम्फा  झाला असावा . आज पर्यंत हेच नाव त्याला चिकटलय. नावा प्रमाणेच बऱ्याच गोष्टीही त्याच्या बद्दल प्रसिद्ध आहेत. गम्फा जादू टोणा  करतो. नजर लावतो.  एकदा माझा मित्र अशोक सांगत होता … "या गम्फा पासून सावध राहायला पहिजे. त्याने मनात आणल तर होत्याच नव्हत  करू शकतो तो. पाटलाच्या म्हशीला दहा शेर दुध होत. पाटलाने या गम्फाचा अपमान केला कधी तरी. तेंवा यानं काय जादू केली देव जाणे  … म्हशीचं  दूधाच आटल. मग पाटलान ह्याला एक बकरी दिलि. तेंवा कुठे दुध सुरु झाल !"
लोक म्हणतात  त्याला  भूत नाथ प्रसन्न आहे.  तो दर अमावास्येला स्मशानात जाऊन पूजा करतो.  रात्री जंगलात जाऊन भूतांशी बोलतो. या सगळ्या गोष्टींमुळे लोक त्याला बिचकून असतात. विनाकारण कोणी त्याच्या वाट्याला जात नाही. लहान मुले त्याच्या दृष्टीत येऊ नयेत म्हणून प्रयत्न करतात. एवढच नाही तर गाईच नवजात वासरू देखील काही दिवस गोठ्यात आडोसा करून तिथे ठेवतात. वासरू झाल्यावर आधी गम्फाला दक्षिणा देतात आणि मगच त्याला उघड्यावर आणतात. त्याचा कोप होऊ नये म्हणून.  गम्फाही मग  काही तरी मंत्र म्हणतो आणि म्हणतो … कल्याण हो …

     गम्फाची माळाच्या पायथ्याशी झोपडी आहे. तिकडे फार कोणी फिरकत नाहि. कधी कोणी तिकडे गेला तरी गम्फा त्यांना भेटत नाही. तो फिरत असतो जंगलात. त्याची भेट होणार कधी तरी तो गावात आला किंवा शेतात आला तरच. शेतात आला कि लोक त्याला स्वतः होऊन कधी तुरीच्या शेंगा, कधी हरभरा तर कधी भुईमुगाच्या शेंगा देतात. उगीच ह्यानं नजर लावली तर पीक जाळून जाइल. एरवी तो काय करतो कुठे जातो याची कोणालाच काही माहिती नसते. किंबहुना कोणाला काही पडलेलीच नसते.

   अशा या उपेक्षित गम्फाची लोकांना एका वेळी मात्र हमखास आठवण येते. खेळता खेळता  एखाद पोर कधी अचानक आजारी पडल, किंवा चांगला कामाचा तरुण मुलगा हात पाय बांधून घरी बसला कि गम्फाला बोलावणं जात. भूत प्रेताची बाधा झालेली… गम्फा त्याच्यात एक्ष्पर्ट माणूस. बोलावणं जात म्हणजे काय  हाकाराच   उठतो.  आठ  दहा जण गम्फाला  शोधायला  बाहेर  पडतात. गम्फा रे …ए गम्फा … असा पुकारा सुरु होतो. मग कोणाला तो भेटला कि सापडला रे ... अशी हाळी देउन इतरांना सूचीत करतात. गम्फा मग  त्याचं सामान घेऊन येतो. अंगणात जाळ  करून मीठ मोहऱ्या जाळतो. कडू निम्बाचा रस करून त्या पोराला पाजतो. आणखी काही काड्या उगाळून चाटवतो. आणि तोंडाने काही तरी मंत्र पुट पुटतो. आणी सगळ्यांना सांगतो "वाईट वेळ आली होती. पण आता टळली आहे… सकाळी पोरग उठून बसणार". आणि चमत्कार म्हणजे तस होतही. मग घरचे त्याला पायली भर ज्वारी देतात. आणि तोही आशीर्वाद देतो
. . . . कल्याण हो . . .

    एकदा मी आणि माझा मित्र जंगलातल्या तळ्यात गेलो होतो पोहायला. कोणाचा तरी किंचाळण्याचा आवाज आला … म्हणून त्या दिशेने धवलो. शेळ्या चारणाऱ्या मन्याला साप चावला होता. गाव तिथून  खूप दूर होत. काय कराव कळेना. इतक्यात तिथे गम्फा आला. तोही आवाज ऐकूनच आला होता. त्याने जरा मन्या च्या शरीराकडे पाहिले. "साप विषारी होता. तोंडातून फेस येउन राहिलाय." त्याने झटकन त्याच्या पायाची दोरी सोडली. आणि ती मन्याच्या पायाला बांधली. जेणे करून विष शरीरात पसरू नये. त्याच्या जवळ असलेल्या ब्लेड ने एक चीर मारली पायावर. कडू निंबाच्या पाल्याचा रस करून त्याच्यात आणखी काही पानं मिसळून ते मन्याला पाजला. मग आम्ही तिघांनी त्याला अलगद उचलून गावात आणला आणि एकाच्या गाडीत बसवून त्याला तालुक्याला रवाना केला. मन्या वाचला. त्याच्या आजी ने तोंड भरून आशीर्वाद दिले गम्फाला. गम्फा मात्र हे ऐकण्या आधीच पुन्हा जंगलात पसार झाला होता.

या घटनेनंतर मात्र माझ त्याच्याबद्दल च मत पूर्ण बदलल. मी त्याच संध्याकाळी मुद्दाम त्याच्या झोपडीवर गेलो. त्याची झोपडी पाहून मी थक्कच झालो. चांगलं मोठ अंगण होता त्याला. अगदी स्वच्छ. सडा टाकलेला…
अंगणाच्या भोवती वेग वेगळी झाड. काही फूलांची … काही औषधी. झोपडीला दार नव्हतं. आत अंधार होता. आणि थोडासा धूर येत होता. गम्फा घरातच होता. मी आवाज दिला "आजोबा…".  गम्फा बाहेर आला. हसून म्हणाला तू आलास व्हय. . . ये बाबा. बस. त्याने अंगणात बाज टाकली. मला वर बसवून तो खालीच बसला. मी म्हणालो काय स्वयंपाक चालू आहे का? "व्हय… भाकर थापत होतो !!! तू कसा काय आलास हिकडे?"
"काही नाही… सहज …"  .      "सहज? इथ कोणी सहज येत नाही. आणि हे पहा. मला आजोबा म्हणू नकोस. नात्यात अडकायच नाही मला. मला गम्फाच म्हण. तुला दुपार बद्दल बोलायच आहे ना ?"

मी म्हणालो "हो… म्हणजे मी पहिल्यांदाच तुम्हाला इतक्या जवळून पाहिलं . मी जे तुमच्या बद्दल ऐकलं होतं ते … " मी जर अडखळतच बोलत होतो.

गम्फा म्हणाला  "ते काही सगळच खोटं नाही. काही खरं आहे. काही मीच लोकांना सांगितल आहे. हे खर आहे कि मी रात्री बेरात्री स्मशानात जातो. जंगलात जातो. अरे पण ते झाड पाला गोळा करायला. स्मशानात बेलाच झाड आहे. त्याची फळ आणतो मी… औषधी बनवायला. "

"पण ते भूत वगैरे"

"भूत? हाहाहा …" गम्फा मोठ्याने हसला. "एवढा शिकलेला ना तू? भूता वर विश्वास ठेवतो?  मी आज अठ्ठ्याहत्तर वर्षांचा आहे. आज जवळ जवळ साठ वर्ष मी जंगलात जातो. मला आज पर्यंत भूत काही दिसल नाही.  भूत माणसाच्या मनात असतं  रे. "

"मग हे अस एकट राहणं … गावाच्या बाहेर…"

"काय सांगू तुला? चांगलं घर होतं आमचं. बपाकडे पाच एकर जमीन  होती. खाउन पिउन सुखी होतो. पण साप चावून बाप गेला. आई आधीच गेली होती. सावकारानं  कर्जाच जाळ टाकलं … आणि जमीन हडप केली. गावात कोणी मला साथ दिली  नाही. गरिबाला कोणी वाली नाही .  एकटा जीव. मजुरी केली… पुढे लग्न झालं … पोरं झाली. चांगलं चालू होतं … पण खाण्यातून काय विष बाधा झाली देव जाणे … माझ्या डोळ्या समोर दोन्ही पोर  दगावली… बायको तालुक्याला नेईपर्यंत जगातून चालती झाली."

गम्फा आता स्वताःशीच बोलत होता… "माझ काही कशात मन लागेना … गावात सगळे  उलट सुलट बोलत सुटले… आधी आई बापाला खाल्लं … मग  बायको पोरांना … मला काही सहन होईना… मी सरळ उठलो आणि रानात निघून आलो. असा जंगलात राहतो म्हणून लोक काही बाही अफवा पसरवायला लागले. गोष्टी तयार करून सांगायला लागले. मला माणसांचीच चीड आलि. मी म्हनल - लोक म्हणतात ना मी भूताशी बोलतो… मग बोलतो मि. लोक घाबरतात न मला … चांगलंच आहे ना मला. घाबरतात म्हणून कोणी माझ्या जवळ येत नाहि. मलाही लोक नकोच होते. मग मीही लोकाना गोष्टी रंगवून सांगायला लगलो. मला विद्या प्राप्त आहे … भूत प्रसन्न आहे. लोक आणखी घाबरत… आणी दूर जात "

मी म्हणालो " पण मग ते लोक बरे कसे होतात? तुम्ही त्यांच भूत कस काढता?"

"अरे बाबा … तेंव्हाचा मी तुला हेच सांगून राहिलो. भूत माणसाच्या मनात असते. रोग माझ्या औषधाने बरा होतो. जंगलात राहून सगळी औषधी झाडं  पाठ झालीत मला. मी नुसतं  औषध दिल तर लोक म्हणतात… गम्फा मंत्र म्हण… मला काय मी म्हणतो मन्त्र. माणसाला जेन्वा खात्री वाटते कि मंत्राने भूत जाणार … तेंवा ते नक्की जाते."

मी म्हणालो … "पाटलाची म्हैस ?"

"अरे काही बाही खाल्ला असेल तिने… म्हणून दुध बंद झाल. पाटला न बकरी देलि. मी कशाला नाही म्हणतो ? मी काही मंत्र  फेकले. औषधी पाला खाऊ घातला. दुध पुन्हा सुरु झाल.  अरे हा काय नळ आहे का पाण्याचा ? पाहिजे तेंवा सुरु अन पाहिजे तेंवा बंद?

"बर आता बराच उशीर झाला. घराला जा. नाही तर लोक म्हणतील मी तुला नजर बंदी करून ठेवलाय इथे."

असा म्हणून गम्फा उठला. माझ्या हातात एक कसली तरी पुडी दिलि. आणि म्हणाला

"तुला अपचनाचा त्रास आहे ना? ही भुकटी घे. जेवण झाल्यावर खात जा पाण्यात मिसळून. "

"तुम्हाला कस  कळल?"

"अरे तेंवा पासून वास सोडून राहिलाय. "

असा म्हणून मोठ्याने हसला… आणि पुडी हातात घेऊन मंत्र  म्हणाला " ओम भट जय कालि. जय भूत नाथ."

मी पुडी घेतली… त्याला नमस्कार केला .

गम्फा म्हणाला " कल्याण हो… "

Tuesday, April 24, 2012

digu

दिगू

        हल्ली गावी जाण फारसं होत नाही. वर्षातून एखादी चक्क्कर मारतो. माझं गाव रुई. भुवया उंचावू नका. अशा नावाचं गाव आहे. तालुका माहूर ,जिल्हा नांदेड. मुंबई हून दुपारी ३ वाजताची नंदीग्राम एक्ष्प्रेस पकडून १५ तास प्रवास करून किनवटला उतरायचं. तिथून एस टी ची बस पकडून १ तासात माहूर. तिथून शेअर रिक्षा (स्थानिक भाषेत त्याला आटो म्हणतात)  करून रुई ला पोचायचं. या प्रवासास एखादा तास लागतो. माहूर च्या डोंगर पायथ्याशी रुई गाव. (वनराई ने नटलेलं वगैरे विशेषणं मी लावणार नाही.कारण ते काही खरं  नाही  ). माहूर चा घाट  उतरून पायथ्याशी असलेल्या केरोळी फाट्या पासून आत वळायच. कच्चा आणि  (उन्हाळ्यात गेलात तर भकास) रस्ता आणि तीन मोठे पण कोरडे ठणठनित नाले ओलांडून मग येत आमच रुई गाव. रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी मुले तांब्या (याला टमरेल म्हणतात) घेऊन रांगेत  योग साधना करतांना  दिसली कि गावाच्या वेशीत पोचल्याचं कळतं. (तसं सरकार ने सगळ्यांना शौचालये बांधण्या साठी  साहित्य दिलं होत  पण लोकांनी  ते  विकून टाकलं.  बंदिस्त खोलीत  अशी काम करणं त्यांना मान्यच नाही.)    मग तिथे रिक्षा सोडून घरापर्यंत पायी जायचं. लहानसं गाव त्यामुळे  सगळेच ओळखीचे. नमस्कार चमत्कार घेत लहान मोठ्यांची चौकशी करत आम्ही पारापाशी येतो. आणि तिथेच "त्याच" पाहिलं दर्शन होतं.

      पारावर मारुतीच छोटंसं मंदिर आहे. पूर्वी फक्त मूर्ती होती. मंदिर हल्लीच बांधून काढलय. मारुतीच्या चरणाशी नत मस्तक होतो. आणि मागून हाक येते. राम राम मालक. मागे बघतो तर दिगु हात जोडून उभा असतो. "यंदा आमदार निधीतून मंदीर बांधून काढलं", डीगु म्हणाला. "लोक नुसतेच बोलतात मी करून दाखवलं. आता पुढच्या साली  पाण्याचं टाक बांधून घेतो. बायका पोरींना लई दूर जाव लागते पाण्या साठी." त्याचं ते  बोलण आणि  त्याचा अवतार आता नेहमीचा झालेला, त्यामुळे त्याच काही विशेष वाटत नाही.
भली मोठी दाढी वाढलेली, केस पिंजारलेले. एकावर एक असे २ शर्ट घातलेले तेही फाटलेले. खाली कळ कट्ट विजार. पायाला भल्या मोठ्या भेगा पडलेल्या. चेहरा मात्र आनंदी आणि फ्रेश.
एकंदरीत तो तश्या अवतारात भिकारी तरी दिसतो  किंवा वेडा तरी.

    दिगू म्हणजे किसन  गायकवाड  चा मुलगा. मोठा दिगंबर, लहान संतोष. दिगू माझ्यापेक्षा ४-५ वर्षांनी तरी मोठा.
दहावी फेल झाल्यावर गावात उनाडक्या करत फिरणे आणि नसलेले ज्ञान पाजळणे हाच उद्योग. शिकत नाही  म्हटल्यावर बापानं  त्याला  शेतीच्या कामाला  जुंपला. नाईलाजाने दिगू शेत मजुरी करू लागला. खरं म्हणजे ती मजुरी कमी आणि मुजोरीच  जास्त होती. त्याला मुळात कामाचा भयंकर कंटाळा. गुरांना चारा कापून देण्यापेक्षा त्यांनाच गवतात सोडायचा. खा लेको किती खायचं ते. आणि स्वतः मात्र पाखरं हकलायच्या मचाणावर झोपून राहायचा. मग जनावर दुसऱ्याचा शेतात जाऊन पिकांचं नुकसान करणार. तो शेतमालक आरडा ओरड करत येणार. आणि दिगू त्यांना शांत पणे उपदेश करणार.  अहो मालक बैल म्हणजे शंकराचं वाहन. त्याला अडवणारे आपण कोण?

      माझे वडील त्याला बऱ्याचदा शेतात मजुरी साठी बोलावत. दिगुला काम देण म्हणजे स्वतःच नुकसान करून घेणं. पण  मजुरांची कमतरता ... आणि किसन गायकवाड म्हणजे बाबांच्या बैठकीचा खास माणूस. म्हणून दिगुला हमखास  कामाचं आमंत्रण जायचं.  सकाळी ६ ला काम सुरु करायचा गावात रिवाज आहे. पण दिगू येणार ८ वाजता. रमत गमत. औत सुद्धा हाणायच अगदी आरामात. बाकीच्या गड्यांच्या २ फेऱ्या नांगरून होणार तेंव्हा कुठे दिगुची एकच फेरी होणार. तत्वज्ञान एकच ... मुक्या जनावराला कशाला त्रास !!! काम काय होत राहील हळू हळू. १० वाजता औत सोडून न्याहारी करणार. मग काट-सावरी च्या झाडा खाली वाईच डुलकी घेतो म्हणून चांगला तास भर झोप काढे. ह्यातही त्याच तत्वज्ञान - जेवल्यावर झोपला नाहीं तर अंगी लागत नाही म्हणे. ११ वाजता बाबांची शेतात दुसरी चक्कर मारायची वेळ. तेंव्हा दिगू उठून पुन्हा औतावर. बाबा रागावले की म्हणे ... मालक, दुसऱ्या गड्यांना कामच करता येत नाही व्यवस्थित. मी कसा खोल वर दाबून नांगर चालवतो. म्हणून मला वेळ लागतो. असाच १-२ तास नांगर हाणून मग पारगीची   वेळ (पारगी म्हणजे ऑफिशिअल  लंच टाइम) चांगली तास भर भाकर खाऊन झाल्यावर पुन्हा एक वाम कुक्षी. नंतर चहाची वेळ. शेतात  पाणी देणं सुरु असेल तर शेळ्या चारणारे शेळ्की हमखास  त्यांना पाणी पाजायला आणत. दिगू एखादी शेळी पकडून  दुध काढून घेई. मग  चहा करून  त्या शेळ्क्याला आणि इतर गड्यांना चहा करून पाजणार. अविर्भाव असा की ह्याच्या सारखा दानशूर कोणी झालाच नाही. हे सगळं झाल्यावर एखादा तास  काम  करून निघाला घरी जायला. बाबांनी तर त्याच नाव  कार्य सम्राट ठेवलं होत.

       सगळ्यांची होतात तसं त्याचही लग्न झालं. मुलं झाली. गावात सगळ्यांना वाटलं आता तरी जबाबदारी ची जाणीव होईल. पण काही फरक पडला नाही. त्याचं असंच सुरु राहिलं. दिगुचे आई वडील  गेल्यावर  संतोष ही लग्न करून दुसऱ्या गावी गेला.  दिगुची बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.  माझे वडीलही देवाघरी गेले. आणि दिगुचा आधारच गेला. पण हे सगळं जसं काही त्याच्या पथ्यावरच पडलं. दिगूने काम करणच सोडून दिल.

      जगातला सर्वात सोपा उद्योग त्यानं सुरु केला. भिक्षाम देही. मिळेल  तिथे मिळेल ते खाऊन पडून राहायच.  कधी पाटलाच्या ओट्यावर... कधी पारावर निद्रासनात पडलेला दिगू लोकांना आता सवयीचा झालाय . पोटाची सोय फुकटची झाल्यावर माणसाला तत्वज्ञान फुटत. पारावर बसून दिगू लोकांचं भविष्य सांगतो. मोठ्या मोठ्या थापा मारतो. एकदा मला सांगत होता, मालक  तुम्हाला शिक्षणासाठी कर्ज  पाहिजे असेल  तर सांगा. आमदार आपला माणूस आहे. एका दिवसात तुमचा काम  करून देतो. त्याची चेष्टा करायला लोकही त्याला चढवून देतात . मग  हा आणखी चेकाळतो.
   
      असं करता करता दिगुला ठार वेड लागलं. तो काही दगड घेऊन लोकांच्या मागे लागत नाही. की कोणाला शिवी गाळ करत नाही. गाव भर चिंध्या झालेले कपडे आणि पाठीवर एक कसलं तरी पोतं घेऊन हिंडत असतो. आणि लोकांना तत्व ज्ञान देत असतो.
     
      एकदा असाच गावी गेलो होतो. सकाळी उठून समोरच्या अंगणात बसलो होतो. "राम राम मालक !"  म्हणून हात जोडून दिगू उभा. माझ्या उत्तराची वाट न   पाहता तो आसनस्थ झाला. अवतार तोच . घाणेरडे कपडे आणि एका हातात  काठी आणि दुसऱ्या हातात  झोळी वजा पोतं. "तुम्ही आले म्हणून लोक  सांगत होते. म्हणून  तुमच्या संग चहा प्यायला आलो".  मी आईला चहा टाकायला सांगितलं. समोरच्या रस्त्या कडे बघत दिगू म्हणाला "बरसातीत लई चिखल  होतो या रस्त्यावर. मी आमदाराला सांगतो आमदार निधी तून  हा  रस्ता बांधून द्यायला".  आता मात्र मला सहन  होईना. मी त्याला जरा रागानेच  म्हणालो "दिगू अरे काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? अरे कोण आमदार? लोक  तुला चढवतात आणि तुही चढतोस . काय हा हाझा अवतार. बघवत नाही रे. का झालं हे असं? "

     मला व्यथित झालेला पाहिल्यावर दिगू म्हणाला "मालक दुखी होऊ नका. नशिबात जे असते तेच आपल्याला मिळते. अहो मी एकटा जीव. काम करून कमाई करून कोणता महाल बांधायचा आहे आपल्याला? दोन टाईम चं मिळते न खायला. समाधान आहे. लोक पुण्यवान आहेत. आज पर्यंत मला एक दिवस हि उपाशी ठेवला नाही. रोज कोणी न कोणी मला शिळी का होईना ... पण भाकर देतेच खायला. बरं आपल्याला काही जास्त अपेक्षा नाही. गव्हाचीच रोटी खायची कधी इच्छा झालीच तर पाटलाच्या घराकडे चक्कर मारतो. तीही इच्छा पूर्ण होते."
        मी म्हणालो "अरे पण असं वेड्याचं सोंग घेऊन का फिरतोस मग? घाणेरडा राहतोस. काय तुझे कपडे ... काय ती झोळी" 
        यावर दिगू म्हणाला - गाव आपल्याला जेऊ घालते मालक. आपलंही काम आहे गावाच्या कामी येणं. असा वेड्यासारखा फिरून ... विनाकारण बडबड करून लोकांचं मनोरंजन करतो मी. इथे गावात काही तुमच्या  शहरा सारखी  शिनेमा टाकी नाही. म्हणून मीच त्यांचा शिनेमा आणि मीच त्यांचं नाटक. येता जाता कोणी तरी विचारते - "काय आमदार साहेब यंदा कर्ज माफ होणार का?" मी म्हणतो  "शंभर टक्के होणार. कालच मुख्य मंत्र्याशी मीटिंग झाली. म्या ठणकावून सांगितलं कि गरीब शेतकऱ्याच कर्ज माफ झालाच पाहिजे. " कोणी तरी म्हणतो  "दिगंबर राव, शाळा काढा कि एखादी गावात". मी म्हणतो "यंदा नाही. यंदा पाण्याचा प्रश्न मिटवणार. शाळा पुढल्या साली." विचारणारा खुश होतो. तो मनात म्हणतो कशी फिरकी घेतली येडयाची.
अस आहे मालक. 


त्याचं ते बोलणं ऐकून मी थक्कच झालो. चहा पिऊन झाला. मी त्याला पैसे देऊ केले. तर तो म्हणाला - मालक पैशे देऊ नका. या पैशानं विकत घेता येईल अशी माझी कोणतीच गरज नाही माझी. मी म्हणालो - अरे अस काय करतोस? या पैशातून चांगले कपडे विकत घे. तर दिगू म्हणतो - नाही मालक . चांगले कपडे घालणं मला परवडणार नाही. असा फटका राहतो म्हणून लोक मला विचारतात. उद्या मी जर चांगला राहू लागलो तर कुत्रा सुद्धा हुंग्णार नाही. एकदा लोकांना कळलं कि माझ्याकडे पैशे आहेत  कि मग हा दिगू मेलाच म्हणून  समजा. 


तेही मला पटलं. मी त्याला विचारलं - बायको पोरांची आठवण येत नाही का? यावर दिगू म्हणाला - मालक आठवण तर लई येते. माझा पोरगा आज १२ वर्ष असन. आणि पोरगी १० वर्षाची. लई वाटते जाऊन भेटून याव . पण मग मीच स्वतःला आवरतो. एवढ्यात  शेजारचा संदीप अंगणात आला. त्याने दिगुचं   शेवटचं वाक्य ऐकलं. तो म्हणाला "अहो मग जाऊन या . पोरांना भेटून या." यावर दिगून  डोळा मारला आणि म्हणाला "असं कसं चालल  बाबा. आता आमदार म्हटलं कि लोकांची काम आधी करायला पाहिजे. कुटुंब नंतर. आता हे गावच  माझं. अन  मी या गावाचा !!!"


हे ऐकून संदीप मोठ्याने हसला ... आणि कामावर निघून गेला. दिगुनेही त्याची झोळी उचलली आणि भिक्षां देही करायला निघाला. जाता जाता मला सांगून गेला "वापस जातांना फाट्या पर्यंत चालत जाऊ नका. मला सांगा. मी पी. ए. ला गाडी घेऊन पाठवतो !!!"